Friday, February 3, 2017

विपासना एक अनुभव - एक तरी ओवी अनुभवावी सारखा...

विपासना एक अनुभव - एक तरी ओवी अनुभवावी सारखा...

हि ब्लॉगपोस्ट माझ्याच इंग्लिश ब्लॉगचा स्वैर अनुवाद आहे , माझ्या मराठी मित्रांसाठी

आज ऑफिस ला आलो ते ठरवूनच कि कोणीतरी विचारेलच, काय मग कसा होता ध्यानाचा अनुभव दहा दिवस जगाकडे पाठ फिरवून मी मेहनत केली आणि मी फक्त सांगेन कि "चांगला होता",  माझ्या मेहनतीशी प्रतारणा होईल ती ! माझा अनुभव माझ्याच आठवणीतून धूसर होण्या आधी मी लिहून ठेवला पाहिजे. कुणी सांगावे कुणासाठी ती प्रेरणा ठरेल जाण्यासाठी ! आणि आज ५ वर्ष मी ज्या मार्गावर चालतो आहे , त्याचा लेख जोखा नको का घ्यायला ? तर मग वाचा पुढे...


२७ जुलै ते ७ ऑगस्ट २०११

मी आणि माझ्या मित्राने हि तारीख फायनल करून टाकली कि जायचे इगतपुरी ला आणि करून बघायचे हे शिबीर. मला  आठवते त्याप्रमाणे मे महिन्यातच आम्ही फॉर्म टाकून दिले होते .. "बस कुछ तुफानी करते हैं "  आम्हाला हा रस्ता सांगणारा आणखी एक होता तो मात्र आला नाही... बरेचशे कुतूहल , काहीतरी साहस करतोय ह्या हिशोबाने निघालो मुंबईला, कारण इगतपुरी मुंबई हुन जवळ आहे. आणि ज्या पांडुरंगाने आम्हाला धर्माची पहिली डुबकी दिली तो मुंबईचाच जुना मित्र. श्री प्रतापसिंग राजपूत retd. acf  वनविभाग महाराष्ट्र राज्य. साहेबांना घेतले आणि निघालो मुंबई ते इगतपुरी कारने. त्यांना सांगितले कि बाबारे आम्हाला शुद्ध हिऱ्याचे ज्ञान हवे आहे. असे करा , तसे करा सांगणारे तर खूप भेटले , पण कसे करा हे सांगणारा अजून तरी कोणी भेटलेला नाही. सगळी दुकानं  फिरून झाली , सगळे बाबा पालथे घातले , धर्माची पुस्तके कोळून पिलोय , तुला ब्रह्म माया समजावून सांगू शकतो पण स्वतःच्या अनुभवाला काही आजून आलेली नाही... सगळे जमा केलेले ज्ञान आहे , याचे ऐकले - त्याचे वाचले पण स्वतःचे काही उगवले नाही अजून. जमीन तय्यार आहे आणि आम्ही बीज घ्यायला आलेलो आहे. आजही त्याचा हसरा चेहरा आठवतो...म्हटला तुम्ही योग्य वेळी आलात , आणि आता माझ्या सूचना ऐका. धो धो पडणारा पाऊस, मुंबापुरी कधीच मागे पडली धम्मगिरी ( इगतपुरी सेन्टर चे नाव ) पोहोचलो.

सह्याद्रीच्या कुशीत धम्मगिरी म्हणजे कोंदणात जडलेला हिराचं जणू . लखलखणारा धर्माचा ध्रुव तारा. धुवाधार पाऊस , ढगांचा गडगडाट नाही कि विजांचा कडकडाट नाही , फक्त पाऊस रात्रंदिवस फक्त पाऊस ! आम्ही गेलो ते मुळात हे नजरेत ठेऊन कि काय बरे असावे ? करून तर बघू खर म्हटले तर काहीच प्रॉब्लेम नव्हते आयुष्यात , पण लहानपणा पासूनच आवड होती तत्वज्ञानाची , कुणीतरी म्हणावे काय हुशार मुलगा आहे , Intellectual  आहे हो ! विवेकानंद वाचलेला होता. आणि दुःख माझ्याच वाटेला  का ह्याचे उत्तर पण शोधत होतो.  पुस्तक बरीच वाचलेली होती. कॉर्पोरेट भाषेत सांगावे तर,


"To find how mind/ body works, How I can create a harmony in life, Balancing multidimensional aspects of Health, career, goals, relations. Overall to improve my mind-matter balance and efficiency"

एकदाचे जाऊन रेजिस्ट्रेशन झाले आणि रूम मिळाली. ११ दिवस भिक्षुकांचे जीवन जगायचे आणि जगाकडे, स्वतःकडे खऱ्या अर्थाने बिना चष्म्याचे बघायचे.  कुठल्याही घटनेकडे , पात्रांकडे आपण पूर्व ग्रहांतूनच बघतो. सगळे मनाने साठवलेले रंग असतात आणि त्या रंगाच्या चष्म्यातून आपण जग बघतो , आणि नवलाची गोष्ट म्हणजे आपल्याला मुळात कळतच  नाही कि आपण बघत नसून पूर्व ग्रहांनी दूषित झालेला मन त्याच्या मर्जीनुसार आपल्याला दाखवतो आहे. आता इथे शिकायचे कि खऱ्या अर्थाने कसे बघायचे ते.

ज्या दिवशी आपण पोहोचतो त्या दिवसाला शून्य दिवस म्हणतात, ५ वाजता संध्याकाळचे जेवण झाले कि मोबाइल, पैशाचे पाकीट सगळे जमा करून दयायचे!  संन्याशी ना मग कशाला पाहिजे जगाशी संपर्क ?



रूम किंवा डॉर्मिटरी मिळते , जुन्या विद्यार्थ्यांना मात्र स्वतंत्र खोली मिळते. खायचे प्यायचे सामान जमा करून द्यायचे, गंडे दोरे, आंगठ्या, ताबीज, ताईतबांगड्या, पायातले चाळ, तुळशीमाळ  - बाहेरचे सगळे अवडंबर काढून द्यायचे. तंबाखू , बिडी , तपकीर चालत नाही. लिहिण्याचे वाचायचे साहित्य चालत नाही.  पुरुषांची आणि महिलांची स्वतंत्र व्यवस्था , अगदी तुम्ही आई, बहीण, मुलगी,पत्नीसोबत आलेला असलात  तरी तुमची भेट ११ दिवसांनंतरच. ६ वाजता मोठ्या डिनिंग हॉल मध्ये तुम्हाला परत विचारले जाते , बाबानू ११ दिवस आमच्या शिस्तीत राहू शकाल ना ? मधून पळून जाता येणार नाही, सकाळी ४ ते रात्री ९ पर्यंत इथे तापावे लागते. ७ वाजता तुम्हाला बसण्यासाठीचे आसन  दिले जाते आणि पुढच्या दिवसांच्या सूचना मिळतात.


काय करायचे : 


संपूर्ण आर्य मौन , स्वतःशी सुद्धा बोलायचे नाही... नजर पायांकडे , सांकेतिक खुणा नाही कि डोळ्यांचे हसणे नाही., एकटे आलात ना जगात , आता एकटे राहा आणि आत पहा, अंतर्मनात काय चालू आहे ते. काही दैनंदिन गरजे  संदर्भात  बोलणे असेल तर धर्मसेवकाकडे मागू शकतात , टेकनिक  संदर्भात काही प्रश्न असलेत  तर सहायक आचार्याना विचारू शकतात. सकाळी ४ वाजता डाँग  वाजतो , पहिली घंटा वाजते धर्मसेवक उठवण्यासाठी दाराजवळ छोटी घंटा वाजवतात , उठायचे तैयार होऊन धम्म हॉल मध्ये आपापल्या आसनावर जाऊन बसायचे. ४:३० ला डोळे बंद , रात्री सांगितलेल्या सूचनांवर काम सुरु.

  • ४:३० ते  ६:३० ध्यान  ( ६:०० ते ६:३० मंगल मैत्री )
  • ६:३० ते ८:०० न्याहारी आणि आंघोळ
  • ८:०० ते ११:०० ध्यान (८:०० ते ९:०० सामूहिक साधना धम्मा हॉल मध्ये )
  • ११:०० ते १:०० दुपारचे जेवण आणि आराम (प्रश्नोत्तरांचा तास )
  • १:०० ते ५:०० ध्यान (२:३० ते ३:३० सामूहिक साधना धम्मा हॉल मध्ये )
  • ५:०० ते ६:०० संध्याकाळचे हलके जेवण / निंबू पानी
  • ६:०० ते ७:०० (सामूहिक साधना धम्मा हॉल मध्ये )
  • ७:०० ते ८:३० ( संध्याकाळचे प्रवचन )
  • ८:३० ते ९:०० ( सूचना आणि मैत्री )
खूप काही शिकायला मिळाले ह्या दिवसांत , मन आणि शरीर सलग २२ तास काम करू शकतात फक्त २ तासांच्या झोपेच्या शक्तीमध्ये. आळस नाही कि निद्रा नाही. श्वास पाहता पाहता मनाला आपण वर्तमानात राहायला भाग पाडतो. 

आमच्या सोबत कोण होते ? 


४०० जणांच्या समूहात , जीवनाच्या सर्व क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या वयाचे प्रवासी होते. पोलीस, डॉक्टर, इंजिनियर, विद्यार्थी, IITian, जुने शासकीय कर्मचारी , नवीन भरती केलेले IAS cadre, बॉलीवूड, मार्केटिंग , advt क्षेत्रातले , कंप्युटर इंजिनियर, कॉर्पोरेट जगातले VP , रिटायर्ड अधिकारी , शेतकरी, ग्रामीण आणि शहरी , शिकलेले आणि अडाणी, देशी-विदेशी, सरदारजी आणि चायनीज. सर्वच प्रकारची जनता जनार्दन मी तिथे पहिली पण हे सगळे मला कळले १० व्या दिवशी, तोपर्यंत मात्र आर्य मौन. 

विपासना काय आहे ? 

सिद्धार्थ गौतमाने हि विद्या जी अनादी काळापासून चालत आलेली होती , तिला शोधून काढली.  न्यूटन ने गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढला अगदी तसाच. काही नियम हे वैश्विक असतात , ते सार्वभौम असतात, कुणी शोधून  काढला तरी आणि नाही काढला तरी तो अस्तित्वात असतो. ह्या नियमाला शोधून राजपुत्र सिद्धार्थ ज्ञानी झाला, दुःखापासून मुक्त झाला. ज्याने स्वतःच्या मेहनतीने , स्वतःच्या अनुभवाचे ज्ञान जागवले आणि बुद्ध झाला. असे कितीतरी बुद्ध भूतकाळात झालेत आणि कितीतरी बुद्ध वर्तमानात आहेत आणि असंख्य भविष्य होतील. नियम सनातन आहे , अनादी आहे, त्या नियमाचे पालन करून आणि विपस्सना वापरून दुःख मुक्त , विकार मुक्त होता येते. प्रत्येकात बुद्ध बनायचे बीज सुप्त स्वरूपात असते, त्याला विकसित करायचे, ज्ञान जागवायचे. मन शुद्धीकरणाची विद्या म्हणजे विपस्सना. दुःखाचे संपूर्ण उन्मूलन करणारी विद्या.

एका गावापासून दुसऱ्या गावाला जाणारा रस्ता असतो, जोपर्यंत तो वापरात असतो तोपर्यंत तो आस्तित्वात असतो. कालांतराने त्याचा वापर कमी होतो, आणि त्याचे अस्तित्व हळू हळू नष्ट होत जाते, त्याच्यावर झाडे झुडपे वेली  उगवतात वन्य प्राण्यांचा संचार सुरु होतो आणि तो मार्गच नष्ट होतो.  विपस्सना चे असेच झाले. प्राचीन भारतातील ऋषी हे आतल्या जगाचे शास्त्रज्ञ होते, त्यांनी बाहेरच्या आणि आतल्या दोघा  जगांचा सखोल अभ्यास करून जीवनाच्या चाली रीती विकसित केल्या होत्या, कालांतराने या वापरात नसल्यामुळे नष्ट झाल्या.  बुद्धा ने शोधलेली हि विद्या इतर देशांमध्ये प्रसारित झालेली होती, तिला शुद्ध स्वरूपात ब्रह्मदेशाने सांभाळून ठेवली, पिढी दर पिढी जतन करून तिच्यात कुठल्याही प्रकारची जोडतोड न करता, भेसळ न करता ठेवल्यामुळे ती आजही तेच फळ देते जे बुद्धाच्या काळात देऊ शकत होती. 

काय असते आर्य मौन ? 

संपूर्ण शरीराचे, वाणीचे मौन. राम राम नाही , कि हाय / हॅलो नाही. खाली मान  घालून, जमिनीकडे ३-४ पाऊल अंतरा पर्यंत पाहत चालायचे. हसणे नाही कि खुणवने हि नाही. मनातही संवाद नाही..

पैशाचे बोला : १ रुपया हि नको ! धर्म शुद्ध स्वरूपात घ्या ! विकारमुक्त व्हा ! कुणाचा फोटो नाही कि कुणाचे गंडे दोरे नाही, ना हिंदू ना मुस्लिम ना बौद्ध ना ख्रिस्ती ना जैन ! राहणे खाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पूर्णपणे फुकट ! त्यांना तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही !
असे कसे ? हे payback  मॉडेल आहे . ११ दिवस तापल्यानंतर तुम्ही चांगल्या मनाने जे दान देतात त्यावर कुना दुसऱ्याला धर्म मिळतो. नाही दिले तरी काही फरक पडत नाही त्यांना , शेवटी तुम्ही धर्म च्या दानावर राहिलात ना ! सब्ब  दानं  धम्म दानं  जनादी !
पण, खूप कठीण तापावे  लागते , कठोर परिश्रम आणि काटेकोर शिस्त - रिसॉर्ट नाही आहे तो - तपोभूमी आहे ती तापसांची.

न बोलता कसे काम चालते सगळे ? खरं  म्हणजे काहीच बोलावे लागत नाही जर तुम्ही काम करायचे ठरवले कि. मार्ग आतला आहे अडचण आली तर धम्मसेवकांशी बोलू शकता ते पण कमीत कमी. ११ दिवस तुमच्या आयुष्याचे सगळ्यात सुंदर दिवस असतात. तुम्हाला तुमची कॅपॅसिटी कळते , स्वतःची नव्याने ओळख होते, एक नवीन उमेद भेटते जगण्याचा मार्ग सापडतो , अनमोल आयुष्यावर तुम्ही खरोखर प्रेम करू लागतात. 

फायदे काय ? 


११ दिवसात फक्त कामाची क्लुप्ती कळते , काम तर जन्मभराचे आहे.  ह्या रस्त्यावर ज्याला मी राजमार्ग समजतो टप्प्या टप्प्याने ठराविक मुक्काम लागतात - अगदी प्रत्येकाला आपापली प्रगती मोजता येते, शुद्ध विज्ञान आहे.

झोप कमी होते , शरीरात प्राणाचा संचार वाढल्यामुळे निरोगी होते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते, किरकोळ आजार (सर्दी-खोकल्यासारखे ) बंद होतात. मनाचे भटकणे कमी झाल्यामुळे कामाची शक्ती ४ पटीने वाढते. सगल्यांबद्द्दल प्रेम वाटत असल्यामुळे आपोआप आनंद वाढतो. आणि विशेष म्हणजे हे सगळे बेगडी नाही , वरवरची पॉलिशिंग नाही, जे आहे ते खरे सोने आहे- कुठल्याही कसोटीवर ह्या स्वतः जागवलेल्या अंतरीच्या ज्ञानाला घासून बघा...

१० दिवस घरदार सोडून - जाणे १००% उपयोगी आहे. त्याच घरासाठी मोठी ताकद मिळते.   

१८ नोव्हेंबर २०११ - एक आढावा 


परत हा माझा स्वतःचाच स्वतःशी संवाद आहे. हा ब्लॉग मी स्वतःसाठी आणि वाचणाऱ्याला प्रेरणा मिळावी ह्या उद्देशाने लिहिला होता. 
मन तोपर्यंत विश्वास ठेवत नाही जोपर्यंत ते अनुभव घेत नाही.
हा सगळं प्रपंच मनाला आपला गुलाम करण्यासाठी आहे.
नुसत पुस्तके वाचून कोणी पोहायला शिकेल का ? शेवटी तुमच्या अनुभवाचे ज्ञान तुम्हाला उपयोगाचे आहे. बुद्धाच्या ज्ञानाने एकटा बुद्धच मुक्त झाला. जो मेहनत करतो आणि या रस्त्यावर चालतो तो  आज ना उद्या मुक्कामावर पोहोचतोच. 
बुद्धीच्या क्षेत्रात मन तुमचा गुलाम नाही बनू शकत. हा नोकर जो डोक्यावर चढून बसला आहे - काही ना काही कारण काढून तुम्हाला संभ्रमात ठेवेल - शेवटी त्यावरच त्याची गाडी चालते. 
हे समजायला खूप विचित्र आहे पण एक बुद्धिजीवी, विज्ञाननिष्ठ आणि विवेकरुपी भक्तीचा मी तुम्हाला सांगेन कि ह्या अग्निदिव्यातून एकदा जा. आयुष्य बदलून जाईल. 
१० दिवस सन्याशाचे जीवन जगून तर बघा- खूप कठीण आहे पण अशक्य नाही.
"काहीच ना करण्यासारखे" काठी काम नाही. साक्षी होऊन बघा ह्या साडेतीन हाताच्या देह प्रपंचात - काहीच करायचे नाही - फक्त निरीक्षण करायचे - यथाभूत 
सद्याच्या जगात परिस्थिती अशी आहे कि साधे टॉयलेट जरी जायचे असेल तर पेपर किंवा मोबाइल हातात पाहिजे कारण मनाला एकटा राहायला आवडत नाही, त्याचा नाच तो नाचवतो आणी आपल्याला काळात सुद्धा नाही कि आपण त्याच्या तालावर नाचतो आहे ते.
५ मिनिटे जे मन आपल्याला एकटे पडू देत नाही त्याला ११ दिवस पाहणे कसे असेल ?  महावीराचे काम आहे बाबा , खूप पराक्रम करावा लागतो. मन बंड  करून उठते, घाबरवते , काहीच तिथले आवडत नाही. बाहेर पळण्यासाठी   कारण शोधते.  कमजोर मनाचे २-३ दिवसात गाशा गुंडाळून चालते होतात. 
विपस्सना मध्ये कुठलाच संप्रदाय शिकवत नाही , जो एक खरा धर्म आहे जो अनु अनुला धारण करतो जो तुझ्यात माझ्यात आणि सजीव -निर्जीव मध्ये आहे त्या शुद्ध धर्माचे खरे ज्ञान होते. टरफल गळून पडतात. 

बुद्धाने बुद्ध धर्म नाही शिकवला - त्याने शुद्ध धर्म शिकवला जो धारण करून कोणीही ज्ञानी म्हणजे बुद्ध बनू शकतो. देश-स्थळ-काळापलीकडचा अनादी अनंत इतका संकुचित असेल कि तो फक्त हिंदू किंवा मुस्लिम चा असेल ? इथे गंडे दोरे - तंत्र मंत्राला काही किंमत नाही. विद्यापीठात गणित कुठल्या धर्माचा असतो ? गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणत्या देशाला लागू पडत नाही ? राग हा फक्त हिंदू ला येतो का ? 

इथे कुणाची टिंगल नाही , तुमची मते ११ दिवस बाजूला काढून ठेवा , आतमध्ये पहा - तुम्हाला आपोआप निरंजन सोही चा अनुभव येतो. दिव्य दर्शन वगैरे काही नाही - कुठला देव प्रगट  होत नाही पण आतल्या देवाचे यथार्थ दर्शन होते. कुठलेही हिप्नॉटिसम नाही कि ब्रेन वॉशिंग नाही.  इथे वेळ थांबून जातो. रोज संध्याकाळी १.५ तासाचे प्रवचन असते ते चर्चा करते कि काय करत आहोत आणि का करत आहोत.  कुठल्याच एका मताचे/जातीचे /संप्रदायाचे प्रदर्शन नाही कि दुसऱ्याचे खंडन नाही. गुरुजी जे स्वतःला फक्त शिक्षक म्हणवतात - त्यांच्या भाषेत "बाडा बंदी नाही" खरा धर्म मुक्त करतो- तो भीती दाखवत नाही तो स्वावलंबी करतो. 


आठवणीतल्या कविता

उणीव 

कवी : अनिल  

बदलले रंग आभाळाने 
पांघरून धरतीला अंधारलेणे 
विझला दिवस पळा पळा ने 
कवेत घेऊन शुक्रतारा 

अंधारल्या दशदिशा 
विसावली वेल  वृक्षा वरती 
तेथ उमलली रातराणी 
घालून साद केवड्याला 


दिनरात्रीचा हा खेळ 
लावतोय रोजच ताळमेळ 
मापता मापे ना काळवेळ 
पोरखेळ झाला जगण्याचा 

उमलतो दिवस नव्या आशेने 
फुलतो राजतरंगाने 
संध्याकाळी विस्कटून जातो 
एक तुझ्याच उणिवेने 


यक्षरात्र 

कवयत्री : अरुणा ढेरे 

पाण्यासारखे वाहते सदाचे , 
आयुष्य नावाचे खुळे  गाणे
किनारा धरून रांगत  चालला 
दुःखांचा काफिला मस्तपणे 

सुखाचेही तळ  जातांना घासून 
अस्तित्वाची खूण  कळे  मला 
दिव्यापरी  आता प्राक्तन जोडून 
प्रवाही सोडून श्वास दिला 


आणि रंगगर्द क्षितीज पेटले 
रात्री उजाडले क्षणमात्र 
तमाने टाकली प्रकाशाची कात 
झाली काळजात यक्षरात्र